कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! बांगलादेशने आयात परवाने वाढवले, निर्यात चौपट होणार
13 डिसेंबर पासून दररोज २०० आयात परवाने जारी करण्याची प्रक्रिया सुरू; देशांतर्गत बाजारात दर सुधारण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये आशा.
बांगलादेशकडून आयात परवाने वाढवले
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीसाठी परवाने (Import Permits – IP) मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. यापूर्वी केवळ ५० आयातीचे परवाने देण्यात आले होते, परंतु आता ही संख्या वाढवून २०० परवाने इतकी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातून कांद्याची निर्यात चौपट वाढण्यास मोठी मदत होणार आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारातही कांद्याचे दर बदलू लागतील.
दररोज २०० परवाने जारी होणार
बांगलादेश सरकारने स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी, १३ डिसेंबर पासून दररोज २०० आयात परवाने जारी करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक परवान्याद्वारे पूर्वीप्रमाणेच ३० टनपर्यंत कांद्याची आयात करता येईल. प्रत्येक आयातदार एका वेळी एकच अर्ज सादर करू शकतो. कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील, असे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या कारणामुळे भारतातही कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
भाव वाढतील, पण…
बांगलादेशच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे आणि दर वाढतील अशी आशा आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी चाळीतला साठवलेला कांदाही यापूर्वीच विक्री केला आहे, त्यामुळे विक्रीसाठी पुरेशा प्रमाणात कांदा शिल्लक नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात कांदा शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना, चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.